नमस्कार,
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये आपली शाळा रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षा निमित्त आपल्याशी संवाद साधताना आनंद होत आहे.
१ जुलै १९९७ रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची नवी मुंबईतील पहिली शाखा कळंबोली येथे सुरू झाली. श्री. ढेकणे सर, श्री. शेंड्ये सर, श्री. शुक्ल सर या पदाधिकाऱ्यांनी शाळा उभी करण्यासाठी अधिक श्रम घेतले. आजूबाजूला कोणतीही मानवी वस्ती नसलेल्या या शाळेत १३२ विद्यार्थ्यांनी सुरुवातीला प्रवेश घेतला. सौ. माधवी मतलापुरकर यांची मुख्याध्यापिका पदी नेमणूक झाली होती.
राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या या संस्थेत जीवनावश्यक मुल्यांचीही शिकवण दिली जाते. विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास सांगितला जातो. विद्यार्थ्यांना सुसज्ज मैदान, ग्रंथालय, संगणक कक्ष, बालवाडीपासून सेमी-इंग्रजी माध्यम, अद्ययावत प्रयोगशाळा, ई लर्निंग, व्यक्तिमत्व विकास अशा विविध सुविधा शाळेत उपलब्ध आहेत. विविध सण- उत्सव शाळेत आनंदाने साजरे केले जातात. आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभाग घेतात. तालुकास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
कळंबोली मध्ये अल्पावधीतच शाळेने आपले नावलौकिक मिळवले आहे. नव्याने उदयास येणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आव्हान पेलत मराठी माध्यमाची आपली ही शाळा तग धरून उभी आहे. १३२ विद्यार्थी संख्येने सुरु झालेल्या या विद्यालयात आज १२०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेने रुजवलेल्या या इवल्याशा रोपट्याचे आता विशाल अशा ज्ञानवृक्षात रूपांतर झाले आहे.
असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे ||
या संत तुकाराम महाराजांच्या ओवीनुसार आज कोरुना प्रादुर्भावाच्या काळातही आभासी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास, विविध उपक्रम, स्पर्धा, व्याख्याने अशा विविध बाबींच्या माध्यमातून सातत्याने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत.