म.ए.सो. बद्दल

mes-founder-img

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी

शतकोत्तर हीरक महोत्सवाकडे वाटचाल राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने कै. वामन प्रभाकर भावे, आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आणि कै. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी १८६० साली महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ‘मएसो’ने बालगटापासून उच्चशिक्षणापर्यंत आणि व्यावसायिक अभ्यासक्रमापासून विविध कलांच्या प्रशिक्षणापर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७४ शाखांच्या माध्यमातून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शिक्षणाकडे केवळ अर्थार्जनाचे साधन म्हणून न पाहता त्यापलीकडे जाऊन चांगला माणूस व सजग नागरिक घडविणे यावर म.ए.सो.चा भर राहिला आहे. मनुष्याच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा भागल्या तरी मनुष्याची सृजनशीलता त्याला स्वस्थ बसू देत नाही. ‘कला’ ही अशी गोष्ट आहे जी मनुष्य प्राण्याला इतर प्राणिजीवांपासून वेगळं करते, त्याची उन्नती करते.जीवनात संगीत, अभिनय इत्यादी कलांचे प्रशिक्षण घेण्याचे अनेक फायदे होतात; जसे की, संगीताच्या शिक्षणामुळे स्वतंत्र विचार करण्याची सवय लागते, समूहगीतातून सांघिक भावना वाढीस लागते, स्पष्ट शब्दोच्चाराची सवय लागते, निरीक्षण व अनुकरणातून कल्पकतेचा विकास होतो, देहबोलीचे सामर्थ्य व त्याचा प्रभाव यांची जाण निर्माण होते, गुणग्राहकता व दाद देण्याची मनोवृत्ती तयार होते इत्यादी. अशा या कलेची साधना करण्यासाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. व्यक्तिमत्त्वाच्या विकासात असलेले कलांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने विविध कलांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी मएसो कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सची स्थापना केली आहे.